गणपती आणि इन जनरलच देव-धर्म-संस्कृती-सण-समारंभ-सोहळे यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यामुळे कुणाच्या भावना दुखावणार वगैरे असतील तर पुढे वाचू नका. हा मजकूर तुमच्यासाठी नाही.
मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पाहिलाय, की आपल्यालाही चार लोकांसारखं गणपती आल्यानंतर उत्साही वगैरे वाटावं. पण तसं होत नाही. आधीच पावसाची नवलाई संपून ’पुरे आता, टळा’ या प्रकारचा मूड झालेला असतो. रिपरिपणारा पाऊस, खड्डे, चिखल, रस्त्यावरून तुंबलेलं पाणी आणि त्यात तरंगणारा कचरा… आणि मग शिवाय गणपती.
गणपती, त्याचा लडिवाळ आकार, त्याचं बुद्धीची देवता वगैरे असणं आणि संस्कृती-बिंस्कृती सगळं ठीक आहे, पण आता मला नाही त्यात फारशी मजा वाटत, तर कुणाची काही हरकत आहे का? पण नाही. एकदा गणपती हा शब्द उच्चारला की तुमच्या भावना कश्या उचंबळून इत्यादी आल्याच पाहिजेत. नाहीतर तुम्ही उद्धट. बरं, तेवढ्यावर भागत नाही. आपण ज्यांना वर्षाकाठी फक्त एकदाच पाहतो अशा नातेवाईक कम परिचितांकडे जा, त्यांच्या थर्माकोलच्या भीषण सजावटी पहा, तळलेल्या पोह्यांचा (किंवा मक्याचा) भयानक गोड चिवडा आणि ते पिठूळ लागणारे, त्रिकोणी खोक्यातून येणारे (यात काय मस्णी गोम आहे कुणास ठाऊक), ’काजू मोदक’ नावाचा अपमान करणारे गोळे खा आणि कोरे कपडे चिखलापासून सांभाळायची कसरत करत दिवसाकाठी साधारण तेरा-साडेतेरा घरं घ्या. काय डोंबलाची गंमत?
हां, आता कुणाला बोंबलायची हौस फिटवून घ्यायची असेल, तरी मी समजू शकते. पण मला तीही हौस नाही. मॅडसारखं देवाच्या पुढ्यात उभं राहून ’येई हो विठ्ठले…’ किंवा ’गरुडावर बैसोऽऽऽऽऽऽऽऽनी’ ओरडण्यात नाही बुवा मज्जा वाटत. ते नाही तर नाही, ब्राह्मणी पद्धतीत शांतपणे अथर्वशीर्षाची आवर्तनंही करून पाहिलियेत मी. पण ह्यॅ:! पार मूर्खासारखं वाटतं. एकच एक स्तोत्र आपलं परत परत परत परत म्हणायचं. काय अर्थ?
मोदक या कम्पल्सरी लोकप्रिय पक्वान्नाचंही मला प्रेम नाही. एखादा बरा लागतो गरम असेल (उकड लुसलुशीत शिजली असेल, सारण खमंग असेल आणि तूप रवाळ-ताजं असेल) तर. पण तेवढ्यासाठी तो गणपती आणि आरत्या नावाचा तासंतास ताटकळवणारा प्रकार आणि बेक्कार ध्वनिप्रदूषण सोसायचं? एवढे काही छान नाही लागत मोदक.
भरीत भर म्हणून तो टिळकांनी माथी मारून ठेवलेला सार्वजनिक गणपती नावाचा प्रकार. कसली जागृती आणि आणि कसलं काय! ’ओ’ येईस्तोवर केलेल्या त्या फिरत्या लाइटिंगमधे सौंदर्य असतं, की त्या निर्बुद्ध हलत्या पुतळ्यांच्यात? की तिथे केलेल्या दारूबंदी इत्यादी देखाव्यात?
यात विरुद्ध बाजूनं बोलण्यासारखेही बरेच मुद्दे आहेत. सार्वजनिक उन्मादाला वाट काढून देण्याची गरज, सांस्कृतिक भूक भागवण्याची सोय, विचार न करता माथा झुकवण्यामधली सोईस्कर मानसिक शांती, ’साजरं’ करण्यासाठी निमित्त इत्यादी इत्यादी. थोडीफार फिरवाफिरवी केली तर ते गोकुळाष्टमी, नवरात्र, दिवाळी या सगळ्या सणांनाही लागू पडतात. पण अर्थपूर्णता संपून गेलेली प्रतीकं निव्वळ कर्मकाडातल्या गंमतीसाठी जपणं मला करायचं नसेल, किंवा मुळात मला त्यात फारशी गंमत येत नसेल, तर ती न करण्याचं, तिच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य मला असणार आहे की नाही हा मुद्दा आहे. की तिथेही भावना दुखावल्या अशी सोईस्कर बोंब आपण मारणार आहोत?