‘आपला’ पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला ‘आपलं’ म्हटलं तेव्हा.
नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला ‘आपलं’ म्हटलं तेव्हा.
तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला ‘आपलं’ म्हटलं तेव्हा.
आणि आता,
थेट ‘शोले’मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला ‘आपलं’ म्हटलं तेव्हा.
प्रदेश उजाड खरेच…
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते…
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.
‘आपला’ पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला ‘आपलं’ म्हटलं तेव्हा.