मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

परत रेषेवरची अक्षरे

२०१२ मधे 'रेषेवरची अक्षरे'चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाण, चर्चा, वादविवाद, गॉसिप्स आणि भंकस, उलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स... हे सारं संपणार याची खंतही होती. मधल्या काळात आम्ही ब्लॉग…

७ जुलै, २०१५

२०१२ मधे ‘रेषेवरची अक्षरे’चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाण, चर्चा, वादविवाद, गॉसिप्स आणि भंकस, उलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स… हे सारं संपणार याची खंतही होती.

मधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो. पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे, मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो. ‘रेरे’च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो, शरमलो आणि सुखावलो.

दरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आले, काही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढली, बऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही चित्रगुप्ताच्या तत्परतेनं पुन्हा सज्ज झालो.

‘रेषेवरची अक्षरे’ या दिवाळीत पुन्हा येतो आहे!

आम्ही ब्लॉग्सची यादी बनवायला सुरुवात केली आहेच. पण तुमच्या वाचनात काही नवीन चांगले ब्लॉग्स आले असतील, तर ते आम्हांला ‘[email protected]’ या पत्त्यावर जरूर कळवा. इंटरनेटचं आभासी विश्व प्रचंडच आहे आणि म्हणूनच ‘साथी हाथ बढाना’चं हे एक प्रांजळ आवाहन.

बाकी, यंदा भेटत राहूच!

मेघना भुस्कुटे

साहित्यादि

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2015/07/blog-post.html