मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

यंदा

यंदा मला कुठेतरी मस्त चंपी करून घ्यायला जायचंय. सगळी जुनी कोरडी त्वचा उतरवून टाकायची आहे. गुंजभरही वजन कमी करून न घेता हलकं हलकं, मऊ व्हायचंय. तेच ते संकल्प, त्याच त्या नॉस्टाल्जिक गोष्टी, त्याच त्या चमकदार बेगडी शब्दांच्या जरतारी माळा, तेच ते आउटिंग आणि तेच ते गेट्टुगेद्री…

१ फेब्रुवारी, २०१६

यंदा मला कुठेतरी मस्त चंपी करून घ्यायला जायचंय.

सगळी जुनी कोरडी त्वचा उतरवून टाकायची आहे. गुंजभरही वजन कमी करून न घेता हलकं हलकं, मऊ व्हायचंय. तेच ते संकल्प, त्याच त्या नॉस्टाल्जिक गोष्टी, त्याच त्या चमकदार बेगडी शब्दांच्या जरतारी माळा, तेच ते आउटिंग आणि तेच ते गेट्टुगेद्री निर्जीव संबंध… सगळं एका मिश्कील हसण्यासोबत एखाद्या तळ्यात सोडून द्यायचंय. हळूहळू तळ्याच्या पोटात ते सगळं गडप होईल नि ’पाथेर पांचाली’मध्ये धरते तशी विश्वासू शेवाळाची अलगद साय त्याच्यावर धरेल. त्याच्याकडे बघताना मीही आतून निवांत, आश्वस्त होत जाईन आणि सैलावून, पाण्यात पाय सोडून बसेन तिथेच. उतरती उन्हं असतील. निवांतपणा असेल, पण शांतता मात्र जिवंत असेल. एखादा चुकार बगळा. हात लांबवला तर सहज बोटाला लागेल अशी एखादी हवेवरची सुरेल हाळी. थोड्या तुरतुरमुंग्या.

’आता थोड्या वेळात परतूच…’ असं म्हणता म्हणता किती वेळ जाईल कुणास ठाऊक. पण अंधार पडेल तोही आपण जागरणं करता करता स्वैपाकघरात जातो नि दिवा न लावता सवयीनं पाणी पिऊन परत येतो, तेव्हा भोवती असतो तसा - मायाळू. मग कुठेही परतावं - ते घरच असेल!

यंदा. नक्की.

मेघना भुस्कुटे

काहीबाही

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2016/02/blog-post.html