‘द हॅंडमेड्स टेल’ या कादंबरीबद्दल गेल्या काही वर्षांत खूप लिहिलं-बोललं गेलं आहे. १९८५ साली कॅनडाच्या मार्गारेट अॅटवुड या लेखिकेनं लिहिलेली ही डिस्टोपियन कादंबरी गाजली, लोकप्रिय झाली, तिला अनेक पुरस्कार मिळाले. श्राव्य आणि दृश्य माध्यमांतून तिची रूपांतरणं सादर करण्यात आली. तिच्यावर आधारित असलेला इंग्रजी चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला. या कादंबरीचा प्रभाव असलेल्या अनेक स्त्रीकेंद्री डिस्टोपियन कादंबर्या गेल्या वीसेक वर्षांत लिहिल्या गेल्या. या कादंबरीवर आधारित असलेली मालिका ‘हुलू’ या कंपनीनं २०१७ साली प्रदर्शित केली. तीही खूप लोकप्रिय झाली. सध्याच्या अमेरिकी राजकारणाच्या पार्श्वभूमीशी असलेलं त्या मालिकेचं साम्य थक्क करून टाकणारं होतं. या कादंबरीतल्या ‘हॅंडमेड्स’चा नखशिखान्त रक्तवर्णी पोशाख स्त्रीवादी चळवळींनी आपलासा केला. निषेधमोर्चांमधून वापरला. तो पोशाख कादंबरीच्या पानांतून बाहेर पडून अमेरिकेतल्या स्त्रीवादी चळवळीचं प्रतीक बनला. गेल्या वर्षी ‘द हॅंडमेड्स टेल’चा उत्तरार्ध असलेली ‘द टेस्टामेंट्स’ ही कादंबरी प्रकाशित झाली. २०१९ सालच्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराची ती सहविजेती ठरली. इतकी प्रचंड लोकप्रियता, निर्मितीनंतर पस्तीस वर्षांनीही न सरणारं महत्त्व, साहित्यकृतीची वेस ओलांडून चळवळीशी जोडलं जाण्याचं भाग्य… असं काय आहे या पुस्तकात?
अमेरिकेतल्या अतिउजव्या ताकदींनी सत्ता काबीज करून, ख्रिस्ती शिकवणीची ढाल वापरून, सत्तेची नव्यानं रचलेली उतरंड आणि केवळ प्रजननाचं साधन या पातळीला रेटलं गेलेलं स्त्रीचं सामाजिक स्थान असं या कादंबरीचं सूत्र आहे. अपरिमित आण्विक प्रदूषण आणि कमी होणारा जन्मदर हे कादंबरीतलं वास्तव. या नव्या राष्ट्राचं नाव गिलियड असं आहे. बायबलमधल्या काही कहाण्यांचा आधार घेऊन गिलियडमधल्या सत्ताधार्यांनी उभारलेल्या कडेकोट व्यवस्थेनुसार उच्च राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामधल्या अधिकारी पुरुषांना प्रत्येकी एक जननक्षम स्त्री ‘हॅंडमेड’ (handmaid) म्हणून ‘दिली’ जाते. त्या पुरुषाचं अपत्य जन्माला घालणं इतकंच तिचं काम. त्या अपत्यावर हॅंडमेडचा अधिकार नसून अधिकारी पुरुषाचा अधिकार. अपत्यप्राप्तीकरता त्या अधिकार्याकरवी त्याच्या पत्नीच्या उपस्थितीत – किंबहुना तिच्या सहभागासह – हॅंडमेडवर दरमहा समारंभानं आणि कायदेशीररीत्या बलात्कार केला जातो. त्यातून अपत्यसंभव झाल्यावर हॅंडमेड दुसर्या अधिकार्याला दिली जाते. गिलियडमधल्या स्त्रियांनी वाचन वा लेखन केल्यास त्यांच्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. स्त्रीच्या जननक्षम गर्भाशयाखेरीज तिच्या व्यक्तिमत्त्वाला - फार काय, अवयवांनाही - काडीमात्र किंमत नाही. नायिका स्वतःची गणना उपरोधानं ‘टू-लेग्ड वूम्स’मध्ये (two legged wombs) म्हणजे चालत्या-बोलत्या गर्भाशयांमध्ये करते. समलिंगी संबंध आणि गर्भपाताला साहाय्य यांसाठी देहान्तशासन आहे. सगळ्या जीवनव्यवहारावर ‘आईज’ (eyes) नामक हेरांच्या जाळ्याची अष्टौप्रहर नजर आहे. गिलियडमधल्या एका हॅंडमेडनं नोंदलेल्या अनुभवावर आधारित असलेली संहिता म्हणजे ही कादंबरी.
पर्यावरणाचा सत्यानाश, सर्वंकष सत्ता, दैनंदिन व्यवहारावरचा सत्तेचा पहारा, तंत्रज्ञानाचा वापर, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, तगून राहण्यासाठी माणसांना मूल्यांशी कराव्या लागणार्या तडजोडी… ही अभिजात डिस्टोपियाची सगळी लक्षणं तीत आहेत. या कादंबरीत स्त्रीच्या अवमूल्यनासाठी वापरलेली कोणतीही गोष्ट अॅटवुडच्या कल्पनेतून जन्माला आलेली नाही. कादंबरीतल्या सगळ्या छळघटना स्त्रीच्या बाबतीत जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे प्रत्यक्षात घडलेल्या आहेत, याची खातरजमा करून मगच त्या कथानकामध्ये वापरल्याचं लेखिकेनं स्पष्ट नमूद केलं आहे. ‘कल्पनेची उड्डाणं’ अशा शिक्क्याखाली गोष्टीचं गांभीर्य, भीषणपणा आणि विश्वसनीयता जराही उणावू नये यासाठी घेतलेली ही खबरदारी आहे. १९८५ साली जेव्हा कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा अमेरिकेत रेगनचं (रिपब्लिकन) सरकार होतं. गर्भपातासाठी उपलब्ध होणार्या अर्थसाहाय्यावर सरकारनं टाच आणली. ‘कुटुंबनियोजन म्हणजे गर्भ राहूच न देणं’ असं अप्रत्यक्ष सरकारी धोरण होतं. त्यामागे रिपब्लिकन - अर्थात अतिकर्मठ ख्रिस्ती - धारणा होत्या. ही राजकीय पार्श्वभूमी कादंबरीला आहे.